Skip to main content

आणि सुबोध भावे......"पारू ग पारू वेसावची पारू" गाण्यावर आमच्या सातवीच्या गॅदरिंग मध्ये डान्स चालू

"पारू ग पारू वेसावची पारू" गाण्यावर आमच्या सातवीच्या गॅदरिंग मध्ये डान्स चालू होता. मी जोरात ओरडलो 'जोश्या ही पारू कोण आहे रे स्टेजवर? च्यायला काय दिसतेय यार! शेजारच्या मुलींच्या हुजूरपागा शाळेतून कोणाला बोलावलयं का खास या डान्स साठी.?"
"अरे बुध्द् या नाही रे...तो आपल्या वरच्या वर्गातला भावे आहे."
सुबोधचा कदाचित रंगमंचावरचा हा तो पहिलाच परफॉर्मन्स असेल. तो त्या पारूच्या वेशात इतका सुंदर दिसत होता की आता खात्री पटते की बालगंधर्व त्याच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकलं नसतं. अगदी आपले बनवाबनवी वाले महागुरु सुद्धा नाही.
पुण्याच्या पेठी वातावरणात आणि एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला आमचा नूमविय सुबोध, आज मराठी रंग-चित्रसृष्टी वर एक हाती राज्य करतोय. आमचा हा आनंद फक्त अस्सल
पुणेरी नुमवियंनाच कळू शकतो.
तेव्हा नाही पण आता सुबोधला जवळून ओळखणारे पुण्यात अचानकच "खूप" झालेत. एक काळ असा होता की तो भरतच्या बाहेर (भरत नाट्यगृह, पुण्यातील लोकांना भरत म्हंटलं की रामायण नाही आणि मस्तानी म्हंटलं तर बाजीराव नाही...तर सदाशिव पेठ हे कळते. ) टपरीवर त्याचं ते टिपिकल जीन्स जॅकेट घातलेला, पायात कोल्हापुरी चपला आणि टाईमपास करत उभा असायचा;पुरुषोत्तम, फिरोदिया आणि इतर एकांकिका स्पर्धांसाठी.
तो सुबोध आठवला की वाटतं जिद्द, परिश्रम आणि खंडोबा वरची अढळ श्रद्धा त्याला कुठच्या कुठे घेऊन गेली. घरच्या खंडोबाच्या नवरात्रात अजूनही हा दरवर्षी सहा दिवस पूर्णवेळ एखादा सामान्य भक्ता प्रमाणे कार्यरत असतो. अगदी सामानाची पोती उचलण्यापासून ते आलेल्या भक्तांना स्वतः जातीने पंगत वाढण्यापर्यंत. कोणतेही स्टारडम आणि हाय सोसायटीचे हिल्स बूट न घालता हा जमिनीवर पाऊल ठेवून चालण्याचा भावेरुपी संस्कार त्यांनी अजून जपला आहे. सुबोध अजूनही गणपती मध्ये बायको मुलांबरोबर रुमाल बांधून साधेपणाने स्कूटरवर गणपती बघायला जातो आणि इन्स्टॉवर त्याचा फोटो अपलोड करतो हे पाहून मला नेहमी आश्चर्य वाटतं.
आपल्याकडे स्ट्रगल या शब्दाला गरिबीतून वर आलेला, चाळीत राहायलाय, दुकानात काम करत होता, एनएसडीमध्ये खूप वर्षे काम करून वर आलाय, कोणाचातरी असिस्टंट होता वगैरे सारखी बिरुदावली लावली की फार मोठे काहीतरी आहे असं निर्माण होतं किंवा कधी कधी केलं जातं. परंतु पुण्यातून मुंबईत येणे आणि मराठी रंगभूमी अथवा चित्रपटसृष्टीत नाव निर्माण करणे याच्यासारखा स्ट्रगल हा एखादा सुबोध सारखा पक्का पुणेकर अभिनेताच जाणू शकतो.
स्वतःच्या या खडतर स्ट्रगलला किंवा विविध चांगल्या वाईट अनुभवांना उगाच परिस्थितीची दुःखाची किनार न देता जेव्हा तो घेई छंद सारखे एक पुस्तक लिहितो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते. या पुस्तकात त्यांनी त्याला आलेले विविध अनुभव, त्यानी घेतलेले परिश्रम आणि लोकमान्य टिळक, बालगंधर्व, कट्यार काळजात यासारख्या चित्रपटांची निर्मिती करताना त्यांनी मनात ठेवलेला अखंड आत्मविश्वास हा त्याच्या कसा कामी आला आणि तो त्यात यशस्वी कसा होत गेला याचं शब्द चित्रण उत्तम केले आहे.
कुठल्याही प्रथितयश निर्माता-दिग्दर्शकाच्या घरचा "पाणक्या" होऊन त्याच्याच प्रत्येक चित्रपटात भूमिका मिळवायची, पार्ट१,२ काढायचे आणि स्वतःची हवा निर्माण करायची. असली तद्दन प्रसिद्धी न मिळवता,
स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्तुत्वावर आणि वैविध्यपूर्ण अभिनय करण्याच्या ताकदीवर सुबोध विविध चित्रपट करतोय. हे चित्रपट तिकीट बारीवर यशस्वी तर होतातच आहेत पण प्रेक्षकांच्या मनात सुद्धा कायमस्वरूपी घर करून राहतात.
तसं पाहिलं गेलं तर मराठी चित्रपट आणि रंगभूमी सृष्टीत औरंगाबाद ग्रुप, सोलापुर ग्रुप, नाशिक ग्रुप, ठाणे ग्रुप असे विविध ग्रुप आहेत आणि त्या ग्रुपमध्ये त्या त्या ठरावीक कलाकार त्या त्या ग्रुपच्या पिक्चर मध्ये काम करत असतात. पण इथं पुणे ग्रुप तुम्हाला शोधूनही सापडणार नाही कारण पुणेकर ग्रुप मध्ये सुद्धा स्वतःचाच एकट्याचा त्याचा एक ग्रुप करून असतो.
सुबोध पक्का पुणेकर असल्यामुळे जन्मताच स्वावलंबीपणा नसात भरलेला त्यामुळे स्वतःच्या कष्टावर आणि आत्मविश्वासावर हा मराठी चित्रपट सृष्टीत खंबीरपणे उभा आहे.
हिंदीत जसा अक्षय कुमार सेल्फ मेडमॅन म्हणून ओळखला जातो, तसा सुबोध हा मराठीतला सध्याचा सेल्फ मेडमॅनच (अक्टर)आहे.
जुन्या नाटकांचे सुद्धा उत्तम कलाकृती असलेले आणि तिकीटबारी वर प्रचंड यश मिळवून देणारे कटार काळजात आणि सविता दामोदर परांजपे सारखे चित्रपट सुबोधनी एक हाती यशस्वी करून दाखवले.
त्याच्या नवीन डॉक्टर काशिनाथ घाणेकर मधल्या डायलॉग प्रमाणे म्हणायचं झालं तर ... "मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा संगीत नाटकाच्या तिकीट बारीवर खेचून आणलं या नव्या सदाशिवनी"
लोकमान्य टिळक, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली आणि डॉक्टर काशिनाथ सारखे चित्रपट आणि त्यातली भूमिका सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत लीलया वठवणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्याचा प्रकार आहे.
सतत नवीन करण्याचा ध्यास आणि पक्का नुमविय असल्यामुळे "हाती घ्याल ते तडीस नेण्याचे" बाळकडू शाळेत मिळालेले त्यामुळे प्रत्येक भूमिका अव्वलच ठरेल याची त्याला आणि इतरांना खात्री असतेच.
आता सध्याचेच उदाहरण घ्या ना "विक्रांत सरंजामे". तुला पाहते रे ही मालिका अल्पवधीत हायेस्ट टीआरपी मिळवणारी पहिली मराठी मालिका ठरली आहे. यात सुबोधने जी मनातील चलबिचल चेहऱ्यावर तंतोतंत उतरवली आहे त्याला खरंच तोड नाही. अहो पांढऱ्या केसांचा आणि चाळीशीतला हिरो सुद्धा सिरीयल मधून एवढा हिट होऊ शकतो, दिल की धडकन होउ शकतो.. हे फक्त सुबोधच करू जाणे.
सध्या पंचविशीतल्या मुलींपासून ते पन्नाशीतल्या बायकांपर्यंत सर्वत्र सबकुछ सुबोध अशी परिस्थितीच निर्माण झाली. त्यांच्यासाठी सध्या एकच वाक्य आहे ते म्हणजे "मनोभावे...सुबोध भावे."
आणि हो हल्ली आमच्यासारख्या चाळीशी नंतर च्या पुरुषांना सुद्धा एक नवीन पालवी फुटली आहे बरं त्याच्या या भूमिकेमुळे. धन्यवाद सुबोध.
लिहिण्यासारखे बरेच आहे शब्द, अक्षर, कागद कमी पडतील. त्याच्या वादळवाट मधल्या आवडत्या जयसिंगच्या भूमिकेपासून, हापूस मधला टिपिकल कोकणातला अजित, सनई चौघडे मधला प्रोफेशनल बोरगावकर, तुला कळणार नाहीतला सध्याच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा राहुल, हृदयांतर मधला गंभीर शेखर जोशी ते आता परवापर्यंतचा सविता दामोदर मधला शरद अभ्यंकर आणि पुष्पक मधला मुंबईचा मिशीवाला नातु विलास.
टिपिकल पाट्या टाकत त्याच त्याच हा हु कॉमेडी किंवा माकड चाळे करत हिरो स्टाइलच्या भूमिका न करता, प्रत्येक भूमिका वेगळी, विषय वेगळा आणि बाज ही वेगळाच.. हीच सुबोध ची खासियत आहे.
म्हणून आता शेवटी एवढेच म्हणतो "आपलं हे नाणं एकदम खणखणीत वाजतंयsss... पिक्चर एकदssम टॉप एकदम कडSSSक..."
----मिलिंद सहस्रबुद्धे ©
ता.क.
यापुढे कदाचित मराठी चित्रपटांच्या टायटल्स मध्ये एक नवीन प्रथा सुरू होईल हिरोच नाव .."आणि" सुबोध भावे लावण्याची.

Comments

Popular posts from this blog

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ...

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...