Skip to main content

फादर्स डे निमित्त.. मी...बाबा आणि बाईक (काल्पनिक) ......आज आकाश च्या बाईक वर बसले आणि आकाश नी गाडी सिंहगड रोडवर

आज आकाश च्या बाईक वर बसले आणि आकाश नी गाडी सिंहगड रोडवर सुसाट चालवायला सुरुवात केली.
का कुणास ठाउक, अचानक बाबाची आठवण आली. तो सुद्धा रस्ता मोकळा असला की असाच पळवायचा त्याची लाडकी यामहा 100. काय ते प्रेम त्या काळ्या ठेंगण्या ठुसक्या यामहावर. स्वतः च्या मुलीप्रमाणे जपायचा तीला. माझी धाकटी बहीणच जणू.
पुण्यात आल्यावर बाबांनी पहिली घेतलेली आणि शेवटपर्यंत तीच वापरली. काळापरत्वे आमच्या कडे दोन टु व्हीलर आणि एक मोठी फोर व्हीलर आली पण बाबाची यामहा कायम चालू कंडिशनमधे.तो वापरायचा आठवड्यात किमान दोन तीन वेळा.
मला, रोहीत आणि आईला यामहावर लांब लांब घेऊन जायचं त्याला फार आवडायचं. त्यात त्याला शान वाटायची. कोकणातील नागमोडी वाटा, महाबळेश्वर पसरणी घाट, भर पावसात आम्हाला भिजत फर्स्ट सेकंड टाकत सिंहगडावर नेलेलं अजुनही मनात घट्ट आहे.
तो कोणालाही ती वापरायला द्यायचा नाही, मला आठवतंय ते फक्त बाबाचा बेस्ट फ्रेंड सुहास काका कधीतरी चालवायचा.
दर रविवारी यामहा स्वच्छ धुवायची, आयलींग ग्रीसींग करायचं. आधी काही वर्ष साध्या आईल नी पुसुन चकाचक करायचा. पुढे मग त्याला बाइक शायनिंग क्रिम मिळाले. त्यांच्या परदेशातील मित्रांकडून खास मागवले होते. दसरा दिवाळी ला तर तीची ऐट काही औरच होती. जणू दरवर्षी ती नव्याने जन्म घ्यायची, फक्त नंबर प्लेट सोडून.
रविवारी जेव्हा तो तीच्या वर फिरायला बाहेर पडायचा. काळे कट शुज, पोलो टी शर्ट, जीन्स, त्या वेळी पैसे साठवून घेतलेला रे बैन गॉगल आणि चकाचक केलेली यामहा.. खरंच हीरो दिसायचा, होताच तो माझा पहिला हीरो.
सफाई दार चालवण्यात माहीर होता तो, कधीच गचके नाहीत आणि त्यांच्या मागे बसलं की गाडीच्या वेगाची नशा चढायची. आईकडून त्यांच्या लग्नाआधीचे बाईकचे किस्से ऐकून आम्ही खूप हसायचे रडायचो.
कालांतराने मग रोहित ची नव्या स्टाइलची १५०सीसी घरी आली, पण बाबाला ती फारशी भावलीच नाही. तो कायम त्या RX100 च्या गप्पांतच रंगला.
बाबाची एक खास स्टाईल होती. यामहावर तो मुड मधे असला की "मै जिंदगी का साथ निभाता चला गया" हे गाणं हमखास गुणगुणारच किंवा मग किशोर चं "छोटासा घर होगा बादलो की छांव मै।"
असाच एक दिवस अचानक न सांगता त्या बादलांच्या घरात रहायला गेला ती काळी ठेंगणी यामहा मागे ठेवून...
--***--
---मिलिंद स$बुध्दे

Comments

Popular posts from this blog

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय म...
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ...

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...