Skip to main content

"चिमटा" (काल्पनिक विडंबन)....काल रात्री पाटबंधारे खात्याची फाइल वाचता वाचता कधी झोप लागली

काल रात्री पाटबंधारे खात्याची फाइल वाचता वाचता कधी झोप लागली कळालेच नाही. पुढच्या आठवड्यात अधिवेशनात सभागृहात त्या विषयावर चर्चा आहे. त्यामुळे गेला आठवडा पासून त्या ५००-६०० फाइलींचा स्टडी करतोय.
अचानक जाग आली तेव्हा चांगलं उजाडलं होतं, फ्रेश होउन बाहेर आलो, बघतो तर सौ. गाण्याच्या रेकॉर्डिंग ला आणि मुलगी शाळेला गेलेली. म्हणजे नक्कीच खूप उशीर झालेला उठायला. नेहमीप्रमाणे आंघोळ पुजा आटपली आणि ब्रेकफास्ट टेबलावर बसलो. आज आवडीचे "तर्री पोहा" होते नाष्ट्याला. खात असतानाच प्रवीण (आमचा पी ए) आला, दिवसभराचे शेड्युल अपडेट करायला.
"साहेब, आज ह्या दोन महामंडळाचे कार्यक्रम आहेत, मग ही तीन ठिकाणी उद्घाटने, पक्ष कार्यकर्ते बरोबर बैठक आणि संध्याकाळी पाटील साहेबांकडे पुजेच्या तीर्थ प्रसादाला जायचे आहे."
आम्ही अक्षरशः आ वासून बघतच राहिलो त्याच्याकडे, तोंडात पोह्यांचा घास तसाच. प्रवीण घाबरून म्हणाला"साहेब, काय झालं, काही होतयं का?"
"अरे, काय झालं, काहीच झालं नाही का? आज एवढेच बाकी काही नाही? कोणता मोर्चा नाही? आंदोलकांबरोबर चर्चा नाही; दूध भाजीपाला वगैरे रस्त्यावर ओतले नाही: रास्ता रोको नाही; कुठल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप नाही? काहीच नाही?" " बघ जरा नीट एखादी दुर्घटना तरी असेल, आम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल" त्याला पण थोडे हसू आलं, "खरंच काही च नाही साहेब"... मात्र मले काइ चैन पडेना.
मग काय कधी नव्हे ते आमच्या डाएटिशिन मैडमचे नियम धाब्यावर बसवून आम्ही चांगले दोन प्लेट "तर्री पोहा" खाल्ले. वर परत "आलू बोंडा" बनवायला सांगून ते खाल्ले. काय जीवात जीव आलाय म्हणून सांगू. अहो मनसोक्त खाण्याची मजा काही औरच असते ना.
असो, चैनल सर्फिंग केले, "उघडा डोळे नीट बघून" हेडलाइन पाहिल्या, म्हटले कुणाले चुटकीसरशी मुख्यमंत्री होउन पटापट सह्या करायचे आहेत का बघावं पण काहीच नाही आणि हो कैलेंडर पाहिले तर एक एप्रिल पण नव्हता.
एवढ्यात आमचे लाडके "नाथ" संप्रदायाचे भक्त खानदेशी 'गिरीश"भाऊ आले. " साहेब, चला ताडोबा ला जाउ. वाटेत संत्राबर्फी खाऊ. सकाळी चार्टर्ड नी जाऊ, दुपारची जंगल सफारी करू आणि रात्री परत. नवीन बछडे झालेत वाघीणीला फोटोग्राफीला मजा येईल". गिरीश ला एक वाईल्ड लाइफ, शिकार असली खुप आवड. आमच्याच वयाचा आहे पण फीट आणि फाइन, हेवा वाटतो. डैशिंग आहे गडी. कधी कधी वाटतं त्यालाच देउन टाकावं ग्रुहखातं, पण मग विचार येतो, नको हा कधी कोणाची अचानक शिकार करेल सांगता येत नाही.
त्याले म्हटलं " अरे बाबा नको, ताडोबा, व्याघ्र दर्शन आणि फोटो हि "भवना" वरच्या "युवराजांची" मक्तेदारी. परत आम्ही तिथेही अव्वल ठरलो तर खरे खुरे नाही पण "कागदी वाघ" आमाले खाउन टाकतील."
श्या काहीच न्युज नाही. त्याला म्हटलं लाव रे जरा शिवाजी पार्कच्या "क्रुष्णाला" फोन, म्हणाव वाजव तुझं नेहमीच सुमधुर मराठी गाणं बासरी वर, तेवढाच जरा पुढील दोन दिवस मिडिया वर टाइमपास. (ओह..सॉरी बासरी म्हटलं का मी, मले पिपाणी म्हणायचे होतं)
वर्तमानपत्रात पण काही नाही ना. मात्र योग, योगा आणि योगी झळकत होते मथळ्याखाली. मनात खट्टू झालं "मोटा भाईंना" कर्तृत्व दाखवायला आज काहीच नाही. आम्हा १५-१६ राज्यांच्या नेतृत्व करणार्यामधे कायम स्पर्धा चालू असते कोण कीती जास्त संघर्ष करतोय, टीकतोय आणि वर येतोय. कॉर्पोरेट कल्चर यु नो.
आमच्याकडे आता "संघर्षातून" वर येणार्याला फार महत्त्व प्राप्त झालंय, पुर्वी सारखं "संघटनेतून" वर येणार्याला नव्हे. जेवढे रोज जास्त संघर्ष तेवढे वरच्या दरबारी वजन वाढते.
आज "सामना"वीरांनी सुध्दा आमच्या स्टैंडकडे चौकार षटकार न मारता, डायरेक्ट "बारा" नंबरच्या स्टैंड वर फटकेबाजी करत शतक ठोकलेले वाचून उर भरून आला. वाटलं चेंबर मधे जाऊन जादू कि "झप्पी" द्यावी. सध्या झप्पी ची फैशन आहे म्हणे.
मग कधी नव्हे ते"कुबेर"धन वाचले, हुशार आहे माणूस.
विचार आला जाणत्या राजांनी आमच्या वर काही स्तुतीसुमनं उधळली असतील पण कसले काय काही नाही. त्यांचं एक बरंय, ते सतत टोपीची आदलाबदली करत वातावरण तापवत असतात. पण आम्ही बी "विदर्भाचे" आहो ना उच्च तापमानात काम करण्याची सवय आहे आमाले.
आम्ही मात्र एकच टोपी घालतो आणि ती सुध्दा फक्त विजयादशमीलाच बरे.
खरं सांगू तुमाले , आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाची ५६ इंची छातीची चर्चा... इथं विविध लोकांना आश्वासनं देउन, ती सगळी पोटात ठेवून, आमच्या पोटाचा घेर ५६ इंच व्हायची वेळ आलीय.
अचानक संध्याकाळ झाली, कशी? काय माहीत!... पाटील साहेबांकडे तीर्थ प्रसादाला जायचे आठवले. आमचे परम मित्र "साईभक्त पाटील" साहेब, सध्या विरोधात बसायला लागल्यापासून त्यांची कवी प्रतिभा दिवसागणिक फुलत चालली आहे. आम्ही पण मग कधीतरी र ला र आणि ट ला ट जुळवून ठोकून देतो एखादी कविता. तसे "रामदसां"चे मनाचे श्लोक ऐकतो ना सभाग्रुहात.
बरं तिकडे पुजेला जायला तयार झालो इतक्यात सौ आणि मुलगी घरी आल्या. लगेचच मुलीने हट्टच धरला, "बाबा , राणीच्या बागेत पेंग्विन बघायला जाउ ना" ऐकायला च तयार नाही. विचार केला तीचा बालहट्ट पुरवावाच. पेंग्विन आणण्याचा जर ते पुरवत असतील तर आम्ही बघायचा का नाही पुरवायचा!
मग विथ फैमिली राणीच्या बागेत गेलो, आणि विविध प्राणी पक्षी बघून, मले मनात मजेशीर कंपेरीझन चालू झाली...... तेवढ्यात पायाले काहीतरी चावले आणि आम्ही जोरात "नमो नमो शहाय..!" ओरडतच जागे झालो.
सकाळी सकाळी आमच्या सौ. नी पायाले जोरात "चिमटा" काढला होता, तेव्हा कुठे खरी जाग आली. सौ म्हणल्या " हुं उठा लवकर, उशीर झालाय, खाली दादा आणि गिरीश भाऊ वाट पाहतायत कधीची. आज तुमची विविध समन्वयकां बरोबर मिटींग आहे ना !..."
हुश्श, म्हणजे ते आधीचे सगळे स्वप्न होते तर...मले वाटले "एक उनाड दिवस" आपले नशिबी आला की काय ?...
----मिलिंद सहस्रबुद्धे

Comments

Popular posts from this blog

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ...

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...