Skip to main content

पब्लिक

"ये जो पब्लिक है ये सब जानती है ये जो पब्लिक है"..
हे गाणं ऐकलं की मला नेहमी हिंदी पिक्चर अथवा कोणत्याही हिट फ्लॉप सिनेमाची आठवण येते. हॉलिवूडच्या स्टीवन स्पीलबर्ग पासून ते आत्तापर्यंतच्या नीरज पांडे पर्यंत कोणताही टॅलेंटेड अनुभवी आणि मुरलेला दिग्दर्शक असो, एखाद्या प्रथितयश निर्माता असो, अथवा सुपरस्टार असो, या पब्लिकचं मन असं काही ओळखू शकलेला नाही.
जगाच्या पाठीवर बहुतेक असा कोणीही नसेल जो सिनेमा यायच्या आधी छातीठोकपणे सांगेल की हा पिक्चर सुपर डुपर हिट होईल.
हां ! आता स्वतः स्वतःची फॅन फॉलोइंग फौज तयार करून तीन हजाराच्या वर स्क्रीनवर चित्रपट लावून शंभर-दोनशे करोडची लाल करणारे भाई लोक आहेत. पण ते काही सर्वसमावेशक हिट चित्रपटात गणले जात नाहीत, आणि अहो त्यांनाही ह्या पब्लिकनी "किक" मारलीच आहे की.
तर, या पब्लिकची नस ओळखणे फारच कठीण. ज्या स्पीलबर्गच्या पहिला जुरासिक पार्क ला जगभर लोकांनी डोक्यावर घेतलं त्याचाच पुढचा जुरासिक ची काय अवस्था झाली ते सर्वश्रुत आहे.
आपल्याकडे शोमन राजकपूर ला सुद्धा ज्या "संगम" बद्दल काहीच अपेक्षा नव्हती, तो पार पडदा फाडून सुपर डुपर सिल्वर गोल्डन जुबिली झाला आणि ठोकळा राजेंद्रकुमार रातोरात सुपरस्टार म्हणून गणला गेला. पुढे जाऊन ह्याच राजकपूरनी गाजावाजा करत आणलेला थोड्याफार प्रमाणात त्याचीच आत्मकथा मांडणारा आणि लव्ह, ट्रैजिडी, रोमान्स असं सर्वकाही ठासून भरलेला "मेरा नाम जोकर" अक्षरशः एक दोन आठवड्यातच उतरवावा लागला.
"साला ही पब्लिक काय चीज है।" हे कोणीच सांगू शकत नाही.
क्लासेस आणि मासेस असे दोन वर्ग असलेली हि पब्लिक. हीट चित्रपट मासेस तर पाहतच पण क्लासेस वाले पण तेवढ्याच आवडीने पाहतात तेव्हा खरा तो हिट च्या गणनेत जाऊन पडतो.
मग आपल्याला प्रश्न पडतो की मासेसला किंवा पिटातल्या प्रेक्षकांना आवडणारा "डर्टी पिक्चर" सारखा पिक्चर मासेसला देखील कसा काय आवडतो? अहो हेच तर गुढ रहस्य आहे. एकवेळ बरमुडा ट्रेंगल च रहस्य उलगडेल, त्या मलेशियाच्या MH370 विमानाचं खरं गुढ उकलेल. परंतु "सामना" चित्रपटातल्या "कांबळे चं काय झालं?" सारखं हे हिट पिक्चर चं रहस्य उलगडणार नाही.
"अंदाज अपना अपना" पहिल्या दोन आठवड्यात पडला की काय असं वाटतं आणि अचानक माऊथ पब्लिसिटी मुळे तो इतका चालतो इतका चालतो की ब्लॅक अँड स्टुपिड कॉमेडी च्या पॅटर्न मधला तो एक मैलाचा दगड ठरतो
राजकुमार संतोषी "घायल" आणि "दामिनी" घेऊन येतो आणि सनी देओलचा ढाई किलो चा हात पब्लिक वर जादू करतो. तोच संतोषी तोच सनी देओल "घातक" आणतो आणि हेच पब्लिक त्याला घातक ठरतं. कसं काय बुवा !!
हिंदी मधला मैलाचा दगड ठरलेला असा एकमेव चित्रपट. ज्याच्यावरुन शेकडो कॉपी चित्रपट निघाले आणि ज्याचं नाव घेतलं तरी आत्ताच्या वेबसीरीजच्या जनरेशनमधील यो करणारं टिवरं पोरगं सुद्धा म्हणतं "गब्बर सिंग को कौन नही जानता" वाला "शोले" रमेश सीप्पीला यशाचा एव्हरेस्ट दाखवतो. मग सीप्पी त्याच जोशात "शान" सारखा तगडी मल्टी कास्ट, कडक स्टोरी आणि पॉलिश पिक्चर घेऊन येतो तर तेच पब्लिक अक्षरशः त्याला भुईसपाट करून टाकतं हो।
गुलशन रॉय "त्रिदेव" घेऊन त्रिशतक हिट मारतो पण तसेच त्रिदेव घेऊन तो जेव्हा "विश्वात्मा" आणतो तेव्हा बाराच्या भावात जातो.
आपला मराठीतला आशुतोष गोवारीकर ग्रिक हिरो सारखा दिसणारा रितिक रोशन आणि ऐश्वर्याला घेऊन "जोधा-अकबर" यशस्वी करून दाखवतो आणि मग अजून एक बिग बजेटचा त्याच रितिकचा "मोहोंजोदडो" आणतो तेव्हा मोहोंजोदडो सारखाच तो पिक्चर पण नामशेष करून टाकतय हे पब्लिक.
संजय दत आणि महेश मांजरेकर जोडीचा "वास्तव" हीट होतो. त्याच अपेक्षेवर महेश "अस्तित्व" आणतो आणि काही काळापुरतं त्याचंच अस्तित्वच पब्लिक नष्ट करून टाकते.
"हेरा फेरी" मुळे फॉर्मुला मिळून गेला या नादात प्रियदर्शन सारखा कसलेला दिग्दर्शक आणि कॉमेडीत नवीन विक्रम गाठणारा अक्षय कुमार जेव्हा एकत्र येऊन "खट्टा मिठा" आणतात तेव्हा लोक त्यांना तुम्ही हेराफेरी केलीत म्हणून आम्ही तुमच्या मागे येऊ असं नाही हे दाखवून देतात
बडजात्यांच्या सुरजचा 'हम आपके है कौन" आल्यावर हम आपके है। हे म्हणणारे पब्लिक हम तुम्हारे साथ नही है असं म्हणत "हम साथ साथ है" फुल ऑफ ठरवतात.
अशी समकालीन, मध्यकालीन आणि सुरुवातीच्या काळातली असंख्य उदाहरणं आहेत. कित्येक दिग्दर्शक, निर्माते आणि सुपरस्टार काहीतरी वेगळं नवीन किंवा जे आवडले तेच परत एकदा घेऊन येण्याचा प्रयत्न करतात पण पब्लिकच्या मनात नसेल तर काहीही उपयोग नाही. याची ताजे उदाहरण म्हणजे "झिरो" आणि "ठग्ज ऑफ हिंदुस्तान". त्याचवेळेस आयुषमान खुरानाचा "बढाई हो" १५० कोटीचा गल्ला जमवून हिट होतो.
नक्की हे रसायन काय आहे तेच कळत नाही. काहींना थोडफार कळलं तर त्यांचे चित्रपट फारसे मार खात नाहीत. पण अजूनही तो फॉर्म्युला कोणाला सापडलेला नाही आणि कदाचित सापडणारी नाही.
पब्लिकचा मूड हा बायकां सारखा असतो.. तो कधी बदलेल हे सांगता येत नाही. एखादा रोमॅंटिक चित्रपट हिट झाला म्हणजे पुढचा होईलच असे नाही. जशी यावेळेस लाल रंगाची साडी आवडली म्हणून पुढच्या वेळेस ड्रेस मटेरियल लाल रंगाचंच आवडेल हे सांगता येत नाही तसं.
मला असं वाटतं की त्या त्या काळात पब्लिकला एक रिलॅक्सेशन हव असतं. त्यावेळची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती हे ठरवत असते.
बघा नां साधारणतः काय आवडतं
बरं पब्लिकला....तर कथा आपलीशी असावी असं वाटतं, बरं नुसते आपलीशी नाही तर काहीतरी स्वप्नरंजन त्यात असावं. फैंटसी असावी पण इतकी नाही कि ती फारच खोटी वाटेल. कथा खरी असावी असं नाही पण ती खोटी वाटली नाही पाहिजे. हिरो व्हिलन या प्रवृत्ती असाव्यात पण त्या समकालीन वाटाव्यात उगाच "डाबर" आणि "गब्बर" आत्ताच्या चित्रपटात येऊन उपयोग नाही. गाणी असावीत पण त्यांचा भरणा नसावा. आणि कथेच्या अनुषंगानी ती यावीत. उगाच हीरो वडिलांच्या चितेला इथं बंबई मधे अग्नी देतोय आणि दुसर्याच सीन मधे स्वित्झर्लंडमध्ये हिरोइन बरोबर रोमान्सभरं प्रेमगीत गातोय. हे एक्सेप्ट होत नाही हो. हिरो किंवा होरोसारख्या कॅरेक्टर कडे एखादी तरी अशी स्टाईल, लकब असावी की ज्याची कॉपी करता यायला पाहीजे आणि पब्लिक मध्येच करताना भारी वाटलं पाहिजे. असं काहीतरी रसायन आहे की काय असं वाटतं. अर्थात वाटणं आणि असणं यात जमीन-अस्मानाचा फरक असतोच म्हणा.
कारण पब्लिक ला कधी अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन आवडतो तर कधी तद्दन कॉमेडी वाला गोविंदा. बरं हे दोघं एकत्र आले म्हणून "छोटे मिया बडे मिया" हिट होत नाही. कधी मेथॉडिक परफेक्शनिस्ट आमिर तर कधी तद्दन रोमान्स करणारा हिरो आणि विलनपण असणारा शाहरुख. यांना कधी काय आवडेल हे कोणीच सांगू शकत नाही.
कदाचित म्हणूनच चित्रपट सृष्टीतला प्रत्येक जण देवाची करत नसेल एवढी पब्लिकची धूपारती करत असतो.
राजकारणात निवडणुका जिंकून देणारे, त्यात शह काट"शाह" देणारे चाणक्य सापडलेत म्हणे, पण पिक्चर हिट करून देणारे चाणक्य अजून सापडलेले नाहीत.
कदाचित इथे "चाणक्य" नाही तर दुसरा गाल पुढे करणारे "गांधी" असावं लागतं.. म्हणजे चला हा पिक्चर नाही चालला ना तर न चिडता पुढचा पिक्चर त्याच जोमाने काढणारे.
ता. क.
मला दर शुक्रवारी कोणताही नवीन सिनेमा रिलीज झाला की "रंगीला" सिनेमा मधील आमीरचा तो सुपरहिट डायलॉग आठवतो "ए मिली, आपुन पब्लिक है पब्लिक.. किसी को उठा सकता है और किसी को भी गिरा सकता है। जिसमे अपना पैसा वसूल नही उसका डब्बा गुल्ल..."
---मिलिंद सहस्त्रबुद्धे ©

Comments

Popular posts from this blog

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय मधेच उभे आ
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरांचा जाणता राजा