Skip to main content

बारा दुणे बावीस??

बारा दुणे बावीस??

काही योगायोग जुळून आले तर "सोने पे सुहागा" असं आपण म्हणतो. असे योग जुळून यावेत असं आपल्याला वाटत असतंच असं नाही. पण समजा आलेच चुकून जूळून तर नक्कीच काहीतरी महत्वाकांशी घडेल याची जाणीव अथवा खात्री मात्र आपल्याला असते.

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन तुल्यबळ व्यक्तिमत्त्वांच्या जोड्या आणि योगायोग असा की त्यांच्या जन्मदिवसाच्या तारखा सारख्याच. एक सर्वश्रुत असलेली तारीख म्हणजे १२.
बारा म्हटलं की आठवते किंवा डोळ्यासमोर येते ते पुणे (MH-12), बारामती आणि १२डिसेंबर.
हो बरोबर ओळखलंत! १२ डिसेंबर; अर्थातच माननीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस. तेवढेच वलय लाभलेला, जनमानसात तळागाळात रुजलेला आणि पक्षात नावाजलेला दुसरा माणूस अर्थातच स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे. त्यांची पण जन्म तारीख १२ डिसेंबर.  निव्वळ योगायोग म्हणावा लागेल कि हि दोन्ही व्यक्तिमत्व आपापल्या पक्षात, राज्यस्तरीय राजकारणात अव्वल स्थानावर आणि राजकीय हाडवैरी. पण जन्मतारीख मात्र एकच १२ डिसेंबर. विचारसरणी, कार्यपद्धती, समाजकारण आणि राजकारण करण्याच्या शैलीत भिन्नता असूनही साम्य एकच १२ डिसेंबर.

कदाचित ही दोन व्यक्तिमत्व त्याकाळी एकत्र आली असती आणि सरकार स्थापन केलं असतं तर महाराष्ट्र आज जीथं आहे त्याच्यापेक्षा पुढच्या टप्प्यातल्या प्रगतीपथावर असता. पवार साहेबांचे बेरजेचे राजकारण, दूरदृष्टी आणि आपत्ती (कोणतीही) व्यवस्थापन कौशल्य, तर मुंडे साहेबांचे बेधडक काम करण्याची कार्यशैली आणि प्रशासनावर असलेली घट्ट पकड. यांनी नक्कीच एक वेगळा इतिहास घडवला असता. असा इतिहास जो प्रत्येक समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया ठरला असता.  एकाने मुख्यमंत्री म्हणून यशस्वी कारकीर्द महाराष्ट्र दाखवली होती तर दुसऱ्याने उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद भूषवून त्या पदांचं सार्थक केलं होतं. कामाचा दांडगा उत्साह आणि अनुभव. तळागाळातल्या जनप्रतिनिधीं पासून ते अगदी दिल्ली दरबारी असलेली दोघांची उठबस. ह्या सर्वाचा फायदा नक्कीच महाराष्ट्राला झाला असता.

 हे सगळं म्हणत असतांना, अर्थातच पक्ष आणि विचारसरणीच्या पलीकडे जाऊन आपण पाहतोय, हे महत्त्वाचं सुत्र लक्षात ठेवावे लागेल.

असाच काहीसा, किंबहूना इतिहासाची पुनरावृत्तीच म्हणा जणू, अजून एक योगायोग महाराष्ट्रात पुन्हा घडला. तो म्हणजे 22 जुलै. तशीच दोन तुल्यबळ व्यक्तिमत्व, तेच दोन वेगळे पक्ष आणि विभिन्न विचारसरणी. अर्थातच...
देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार.

८० तासांपूर्ता का होईना तो "सोने पे सुहागा" वाला योग जुळून आला होता. महाराष्ट्राने पहाटेच्या शुद्ध ब्राह्म मुहूर्तावर विविध टीव्ही चॅनल्स वर तो अनुभवला. तो जसा धूमकेतू सारखा अचानक उगवला तितक्याच वेगाने मावळला सुद्धा. अर्थात तो टिकला नाही किंवा मी म्हणेन हा दुग्धशर्करा योग नासलाच.

परंतु बघा ना! पुन्हा तेच, फक्त पक्ष बदल असतील. म्हणजे परत एक यशस्वी मुख्यमंत्री आणि एक तडफदार यशस्वी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री. देवेंद्रजींच बेरीज-वजाबाकी गुणाकार-भागाकार याचे राजकारण तर अजितदादांची बेधडक कार्यशैली, पोटात व ओठात नसलेलं अंतर, आणि प्रशासनावर करडी नजर. एकदा का एखादं काम हातात घेतलं की पूर्ण करणारच हा दोघांचाही आत्मविश्वास. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या प्रगतीपुस्तकावर अभुतपुर्व जोडीचं नाव उमटता उमटता राहीले.

ह्या जोड्या म्हणजे अशा आहेत की हिंदी चित्रपट रसिकांना जसं वाटतं शाहरुख खान आणि आमीर खान यांचा एकत्र असलेला चित्रपट प्रदर्शित व्हावा. एकाची जबरदस्त स्टाईल आणि एकाची मेथड एक्टिंग एकत्र बघता यावी.
तर टेनिसमध्ये आंद्रे आगासी आणि पीट सैम्प्रस नी एकत्र डबल्स खेळून जिंकाव. कारण दोघेही परस्परांच्या पुरक. एक बॅकहॅन्डचा बादशहा तर दुसरा सर्विसचा किंग.
आपल्या लाडक्या क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर, सुनील गावस्कर आणि व्हिव रिचर्ड्स पिचवर खेळतायत. मग साला समोर बॉलर्सची जरी world eleven असली तरी स्कोर बोर्ड फाटलाच समजा.

ह्या जश्या ड्रीम जोड्या आहेत जगभराच्या विविध चाहत्यांसाठी, तशाच महाराष्ट्राच्या राजकारणात समस्त कार्यकर्ते आणि जनमानसाच्या ड्रीम जोड्या (स्वप्नातलं सरकार) आहेत. त्या म्हणजे "पवार-मुंडे" किंवा मग आता "देवेंद्र-अजित". 
नियतीच्या मनात सुद्धा काय असेल ना! पवार आणि मुंडे साहेबांच्या वयात साधारण अंतर दहा वर्षाचं . गंमत म्हणजे, देवेंद्रजी आणि अजित पवारांमध्ये सुद्धा साधारण दहा वर्षांचंच अंतर आहे. खरंच कमाल आहे की १२ आणि २२ मध्ये सुध्दा दहाचंच अंतर आहे.

आज 22 जुलै च्या निमित्ताने देवेंद्रजी आणि अजित दादांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत..... महाराष्ट्राच्या यशस्वी उज्वल प्रगतीसाठी श्री चरणी अशी प्रार्थना करतो की  "कदाचित २०१२ ला १२ डिसेंबर एकत्र येऊ शकले नाहीत पण आता २०२२ ला २२ जुलै एकत्र येऊन इतिहास घडावा"

माझ्या या दोन्ही आवडत्या नेतांना मनापासून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!

© मिलिंद सहस्रबुद्धे
२२/०७/२०२०

Comments

Popular posts from this blog

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय म...
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ...

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...