Skip to main content

करोना संग्रामातील तात्या (राजेश) टोपे

 #कोरोनायोद्धा

*करोना संग्रामातील तात्या (राजेश) टोपे*

भारतात अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व तात्या टोपे करत होते. तसेच सध्या महाराष्ट्रात कोरोना संग्रामाचे राजेश टोपे करत आहेत.  

Rajesh Tope

"कृपया माझ्या विधानाचा विपर्यास करू नका" त्यांची ही कळकळीची विनंती ऐकून मनात चलबिचल झाली. आजकालच्या प्रसारमाध्यमां समोर बोलताना भले भले जण घाबरतात. काही थोर मंडळी तर प्रसारमाध्यमांसमोर येत सुद्धा नाहीत. आपल्या कडून चुकून बोलून गेलेल्या वाक्याची चुकीची ब्रेकिंग न्यूज होऊ नये, या भीतीने त्यांनी त्यांची जीभ चावली.

आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे साहेब अशी कळकळीची विनंती करताना, त्यांना नक्कीच काही वर्षांपूर्वीची आठवण मनात झाली असेल. हयाच देशाच्या प्रसार माध्यमांनी आपल्या एका साध्या,सरळ, कार्यक्षम गृहमंत्र्यांची विकेट घेतली होती. तीसुद्धा अशाच एका संकटकाळात. 

मागील वर्षीच्या एप्रिलपासून हा माणूस सदैव अविरतपणे कोरोना विरुद्ध उभा ठाकला आहे. क्षणाचीही उसंत न घेता तो महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेची गेली १२ महिने अहोरात्र वाहून घेऊन सेवा करतोय. अतिशय कठीण प्रसंगांचा सामना करत असतांना देखील आपल्या नेतृत्व कौशल्याने ही कोरोनाची परिस्थिती सांभाळतोय. 

शरद पवार साहेबांना नेहमीच विविध प्रयोग करण्याची सवय आहे. त्यातील काही प्रयोग यशस्वी होतात तर काही फसतात. परंतु साहेबांचं वैशिष्ट्य हेच आहे की ते परत प्रयोग करायला घाबरत नाहीत आणि करायचे थांबत नाहीत. तरुण तडफदार परंतु मितभाषी असलेला, जमिनीवरचा एक आमदार राजेश टोपे यांना दिलेलं आरोग्य मंत्रीपद. हा साहेबांचा एक यशस्वी झालेला प्रयोग. अजूनही एक प्रयोग केला होता गृहमंत्रिपदाचा, परंतु तो सध्या तरी फसलाय असं वाटते. असो

सुसंस्कृत आणि कार्यक्षम असे "श्री राजेश टोपे". आज हया करोनाच्या "न भूतो न भविष्यती" संकटाचा सामना खंबीरपणे करत आहेत. हे सर्व करताना कोणतीही मोठ-मोठी जाहिरातबाजी न करता स्वतः कामाला झोकून देऊन हा माणूस चोवीस तास कार्यरत आहे. सध्याच्या बावचळलेला प्रसारमाध्यमांसमोर धीराने उभा राहून योग्य ती माहिती जनतेपर्यंत पोहचवत आहे. हातात माईक आणि चॅनल लिहून दिलेले चार प्रश्न विचारणे फार सोपं असते. परंतु राज्य, जिल्हा, शहर, तालुका ते पार ग्रामपंचायत पातळीवर आरोग्य व्यवस्थेचे नियोजन आणि नियंत्रण करणे फार अवघड आहे. हेच नियोजन आणि नियंत्रण टोपे साहेब अत्यंत कुशलतेने संभाळत आहेत. हे सगळं करताना संस्कारक्षम प्रतिक्रिया आणि प्रतिसाद हे त्यांचं वैशिष्ट्य. 

भारतात अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व तात्या टोपे करत होते. तसेच सध्या महाराष्ट्रात कोरोना संग्रामाचे राजेश टोपे करत आहेत.  

त्यांच्या मदतीला विविध पातळीवर अधिकारी असतील तरीही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नेतृत्व आणि निर्णय या दोन्ही महत्त्वाच्या बाजू ते उत्तमरित्या संभाळत आहेत. निर्णय घेणे आणि घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घेणे हे जोखीमीचे काम ते करत आहेत. सध्या संकट मोठं आहे आणि मोठी जोखीमही. इथे जनतेच्या जीवनमरणाचा खेळ चालू आहे. अशा वेळेस पुढे उभे राहून नेतृत्व करणे सोपे नाही.

मागील काही काळात वैयक्तिक आयुष्यात काही दुःखद प्रसंग ओढवले असतानाही हा माणूस थांबला नाही. क्षणभर विश्रांती घेतली नाही. आणि हो, ती तो घेत नाही हयाची त्यांनी जाहिरातबाजी केली नाही. मातृशोक झाल्यावर देखील टोपे साहेब पुढच्या क्षणाला फिल्डवर उभे होते. स्वतःला कोरोना झाला तरीसुद्धा विश्रांती न घेता घरुन अहोरात्र काम करत होते. आज भले-भले नेते फिल्डवर यायला घाबरतात तिथे हा माणूस संयम ठेवून, स्वतः जमिनीवर राहून जमिनीवर कार्य करतोय. 

औरंगाबाद - जालनासारख्या मराठवाड्यातील निमशहरी किंवा काहीश्या ग्रामीण भागातून वर आलेला हा तरुण. स्वतः एक मेकॅनिकल इंजिनिअर असून सुद्धा Health Ministry सारखं नाजूक पण कठीण खातं उत्तमरीत्या सांभाळत आहे. 

सध्याच्या राजकीय परिस्थितीत केंद्र आणि राज्य यांचा समन्वय टोपे साहेब संयमाने हाताळत आहेत. कोणत्याही प्रकारची वायफळ वक्तव्य न करता केंद्राची राज्याला जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी ते रोज प्रयत्न करत आहेत. कोणत्याही पक्षाला अथवा नेत्याला जबाबदार न धरता ह्या संकटातून राज्याला बाहेर काढण्याची त्यांची धडपड दिसते आहे जाणवते आहे. 

एवढ्या मोठ्या कामात जबाबदारी पुर्वक काम करतांना, काही कमी जास्त नक्कीच होतं आहे आणि होणार. परंतु त्याच्यावरच बोट ठेवून त्याच्या ह्या कार्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्यावरुन त्यांच्या कर्तृत्वाला भविष्यात कमी लेखलं जाऊ नये. 

मला आश्चर्य वाटतं की टोपे साहेबांना दिवस-रात्र प्रश्न विचारायला तत्पर असलेली माध्यमं, त्यांचे दोन शब्द कौतुक करायला का मागच्या रांगेत जाऊन बसली आहेत.

सोशल मीडियावर Memes करणे, मुलाखतीचा मोडून तोडून भाग Viral करणे, शंभर कामांपैकी जर १०-२० टक्के कमी पडले असेल, तर तेवढेच का नाही केले हयावर राजकीय पोळी भाजणे. अशा नानाविध बाणांना आणि वारांना झेलत टोपे साहेब आपण ही लढाई जिगरबाजपणे लढत आहात. आम्हाला खात्री आहे की आपण ही लढाई नक्कीच जिँकून दाखवाल. 

सध्याच्या कोरोना संकटात आपण सर्वजण Doctors, आरोग्य सेवेकरी, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर मदत करणारे हया सर्वांचे कोरोना योद्धा म्हणून कौतुक करतो, त्यांना सलाम करतो. मग हया संकटात सरकारचा एक लढवय्या आणि खंबीर मंत्री. स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाची प्रथम काळजी करणारे श्री राजेश टोपे ह्यांचे तेवढेच कौतुक करायला हवे. ते सुद्धा एक कोरोना योध्दा आणि ह्या लढाईत सरसेनापती आहेत. 

श्री टोपे साहेब आज मी कोणाचीही तमा न बाळगता, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो. आपले हे जे कौतुकास्पद कार्य आहे त्याला मानाचा मुजरा करतो. 

तुम्ही असेच खंबीरपणे कार्य करत राहा. आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत. बारा कोटी जनतेचा आशीर्वाद आपल्याबरोबर सदैव आहे.

जय महाराष्ट्र..जय हिंद..

तळटीप - कृपया हा कोणताही राजकीय लेख नसून मला वाटलेल्या आपल्या आरोग्यमंत्री हयांच्या कार्याबद्दलच्या भावना आहेत. मी वरच्या किंवा खालच्या आळीतल्या कोणत्याही मंडळाचा कार्यकर्ता नाही.

© मिलिंद सहस्त्रबुद्धे

सदाशिव पेठ पुणे ३०

६/५/२०२१

Comments

Popular posts from this blog

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय म...
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ...

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...