#सुचणं
सुचलेल्या प्रतिभेची प्रतिमा जर कागदावर योग्य प्रकारे उमटवता आली, तर त्याचं उत्तम साहित्य व्हायला वेळ लागत नाही...
काही सुचतच नाही सध्या? "खूप दिवस झाले, तुझा एखादा लेख article आलं नाही Facebook वर". असं कोणी म्हटलं ना की मनात येतं "काय सांगू?" खूप विचार, खूप विषय मनात येतात आणि चमकून जातात. तेवढ्यापुरतं काहीतरी सुचतं परंतु नंतर पुढे मात्र वाढत नाही.एखादा विषय सुचणं किंवा खरं सांगू का? बसलोय आणि सुचतं असं काहीच नसतं. जसं घरातले दिवे गेलेत, आपण अंधारात मेणबत्ती लावून बसलोय. अचानक पापणी लवताक्षणी पटकन दिवे येतात. ज्या खोलीत बसलोय तिथली ट्यूब पटकन पेटते. तसंच होतं. कोणीतरी काहीतरी बोलत असतं, आपण काहीतरी ऐकत असतो, बघत असतो किंवा वाचत असतो. समोरची बोलणारी व्यक्ती काहीतरी बोलून जाते आणि पटकन आपली ट्यूब पेटते. तोवर डोक्यातले दिवे गेलेलेच असतात. त्या खोलीतली ट्युब पेटली की आपण लगेच बाहेर बघतो. आजूबाजूचे दिवे मग एकामागोमाग पेटतात. अगदी तसंच होतं पहिली ट्यूब पेटते, डोक्यात विषय किंवा विचार क्लिक होतो. मग इतर दिवे जसे पाठोपाठ लागतात तसं त्या विषयाच्या अनुषंगाने फटाफट पानभर सुचतं. त्यानंतर मग साकारतो तो झगमगाट, लखलखाट एखाद्या जमून आलेल्या लेखाचा, कवितेचा, गाण्याचा किंवा कथेचा.
कधी काय सुचेल, कोठे सुचेल हे सांगता येत नाही. प्रतिभा ही लहान मुलासारखी असते. काय प्रश्न विचारून ते लहान मूल आपल्या निरुत्तर करेल हे जसं सांगता येत नाही अगदी तसेच ती तुमच्या मनात कुठल्या विषयावरून कोणता विचार प्रकट करेल आणि सुचायला सुरुवात होईल हे सांगणं कठीण.
प्रत्येकाला काही ना काही तरी सुचतच असतं. गेलेल्या दिव्यानंतर प्रत्येकाची ट्यूब पेटतेच. परंतु आजूबाजूला दिवे पटापट लागतीलच हे सांगता येत नाही. म्हणून तर ज्यांचे पुढचे दिवेपण पटापट पेटतात, ते लेखक, कवी, गीतकार असं काहीतरी होतात.
## सुचलेल्या प्रतिभेची प्रतिमा जर कागदावर योग्य प्रकारे उमटवता आली, तर त्याचं उत्तम साहित्य व्हायला वेळ लागत नाही ##
खूप वाचन करणारे खूप चांगलं लिहितातच असं नाही. मात्र जे चांगलं लिहितात ते नक्कीच बर्यापैकी वाचन करतात.
अडचण अथवा संकट ही जशी नवनिर्मितीची जननी असते. तसंच, एखादा अनुभव, एखादी कटुता किंवा अति आनंद आणि मग त्या क्षणी होणारी मनाची दोलायमान स्थिती हे एखाद्या चांगल्या साहित्याचं उगमस्थान असतं.
लिहिणाऱ्याला वयाच्या कोणत्या टप्प्यावर सुचेल हे सांगणे फार कठीण. मी डॉक्टर होणार, इंजिनियर किंवा आर्किटेक्ट होणार असं म्हणता येतं. परंतु ठरवून कोणाला लेखक , कवी किंवा साहित्यिक होता येत नाही.
एखादी व्यक्ती लेखक अथवा कवी झाली की त्या व्यक्तीने मनात आणलं तरी विचारांचा धबधबा कागदावर उतरवायचा थांबवू शकत नाही. अर्थातच जोपर्यंत ती प्रतिभा जिवंत आहे. प्रतिभा ही कायम येणाऱ्या जाणाऱ्या दिव्यासारखी असते. कधीकधी दिवे थोड्या वेळापुरते जातात तर कधी कधी खूप वेळ. इतर कुठल्याही बाहेरच्या इन्व्हर्टर चा उपयोग होत नाही.
सध्या माझ्याकडचे दिवे बरेच दिवस गेले होते. अचानक "काही सुचतच नाही सध्या?" हया एका वाक्यावर आज "सुचणं" हयावर एवढं बरंच काही लिहून झालं. माझ्या मेंदूतील MSEB नी आज खूप दिवसांनी काम केलं आणि फटकन दिवे आले. ट्यूबतर पेटली, बाकी झगमगाट, लखलखाट झालाय की नाही हे शेवटी तुम्ही वाचकच ठरवाल.
© मिलिंद सहस्रबुद्धे
तळटीप- नेहमीप्रमाणे लिहायला गेलो, पण *सुचलंच* नाही. 😀
Comments
Post a Comment