Skip to main content

लुप्त

 लुप्त

आज सकाळी मुली बरोबर भाजी घ्यायला बाहेर पडलो होतो. अचानक रस्त्याच्या बाजूला दोन बायका कोळशावर कल्हई लावताना पाहिल्या. चार पावलं पुढे गेल्यावर मनात आलं आपण समाजातील कलहं कायमच बघतो, कल्हई क्वचितच बघायला मिळते. आपल्या मुलांना कल्हई म्हणजे काय ते पण कळायला हवं.  मग काय तसाच मागे फिरलो आणि त्या दोघेजणींशी कल्हई करतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढत छान गप्पा मारल्या.

दोघांपैकी एक जण साधारण चाळीशीतली तर एक अगदीच म्हातारी आजी. म्हातारीचा उत्साह तेवढाच दांडगा होता (ज्या उत्साहाने तीने केसांना मेंदी लावलेली होती 😀). मी तीलाच विचारायला सुरुवात केली की तुम्ही कधीपासून करताय वगैरे वगैरे.  मग काय आजीबाईचा चेहरा खुलला आणि सांगू लागली. "दादा पूर्वी लोकं घराघरातून चार पाच पातेली-भांडी घेऊन यायची. रोजचा धंदा होता आमचा. आता मात्र तसं नाहीये. चार-पाचच गिऱ्हाईकं मिळतात, ती सुद्धा रोजची नाही. आली तरी एखाद दुसरे पातेलं-भांडं आणतात." 

"काय करायचं बोला! सामान बी महाग झालंय.   कास्टिक सोडा, नवसागर, कोळसा अन् कथिल धातूची पट्टी. सगळ्याची किंमत वाढलीय बघा. आम्हाला पन पूर्वीसारखं परवडत नाही. पूर्वी म्या तीस चाळीस रुपये भांड्याला घ्यायची. आता मात्र शंभर-सव्वाशे रुपये घेती."   

"एखाद-दुसऱ्या आठवड्याला गिऱ्हाईक होतं. मुलीनं मोबाईल दिलाया. म्या माझा मोबाईल नंबर देऊन ठेवला बऱ्याच ठिकाणी. फोन करून बोलवतात. आमी राहायला जनता वसाहतीत हाये.  सहकार नगर, पर्वती पायथा इथं बऱ्यापैकी काम भेटतात. शीटीमध्ये (गावात) आली कोळसा घ्यायला, की मग बसते अशी एकाद्या चौकात. इथं ही चायवाली दुकानं हायेत, त्यांची असतात मोठाली पातेली कधी मधी." 

मला थोडीफार कल्हई बद्दलची माहिती असून सुद्धा, मी त्या दुसऱ्या बाईला विचारलं, "ताई कशी करतात ओ कल्हई." माझी १० वर्षांची मुलगी बरोबर होती. तीला पाहून तीनं सांगायला सुरुवात केली. "हे बग बेबी, आधी कोळसा पेटवून घ्यायचा. हे असं फॅन फिरवून कोळसा लाल होऊ द्यायचा. त्यावर पातेल्यात कास्टिक सोड्याचं पाणी गरम करातात. मग त्याच पाण्यात फडक्यांनी पातेलं स्वच्छ धुऊन घेतात.  नवसागराची कडक वडी मिळते बाजारात. ती वडी फोडून कुटुन त्याची पूड करतात." 

माझ्या मुलीला ती पुड हातात देत म्हणाली "अगदी घराच्या पांढऱ्या मिठावाणी दिसती बघ. हाय की नाई!" "धुतलेले पातेलं मग कोळशावर उलटं टाकून लालबुंद होईपर्यंत गरम करतात. त्यात नवसागराची पावडर टाकून पिवळ्या पांढऱ्या कापसाने पुसतात."

ती बाई सांगत होती आणि मला लहानपणीची आठवण झाली. नवसागर जेव्हा पातेल्यात टाकतात तेव्हा जो धूर आणि त्याचा वास सर्वत्र पसरतो त्यांनीच आम्हाला आजूबाजूला कळायचं की जवळपास कल्हईवाला आलाय.  नवसागर (Nh4cl) रसायनातील अमोनियाचा तो वास असतो हे नंतर कॉलेजला गेल्यावर कळालं.

तेवढ्यात तीनं त्या कथिल धातूच्या पट्टीने पातेलं आतून घासून घेतलं. अर्थातच त्या

धातूची आणि नवसागरची chemical reaction झाल्यामुळे त्या कथिल धातूचा एक Layer पातेल्याच्या आतल्या बाजूला पसरून ते पातेलं चकाचक झालेलं होतं. त्या बाईने मग ते पातेलं गार पाण्यात स्वच्छ धुऊन गिऱ्हाईकला दिलं. पुढे एक-दोन वर्ष तरी कल्हई करण्याची गरज नाही असं ठासून सांगितलं. 

आम्हीपण मग तिथून निघालो. जाता जाता त्या दोघींची आकृती धुसर होत होती आणि माझ्या आठवणी अधिकच गडद होत होत्या. 

मागील पिढीकडून पुढील पिढीकडे अनुभव आणि पुरेसे ज्ञान न पोहोचल्यामुळे ही कला-कौशल्य पूर्वीसारखी बघायला मिळत नाही. आज योगायोगाने कल्हई लावण्याची कला माझ्या छोट्या मुलीला बघायला मिळाली. ती बघतांना माझ्या डोळ्यासमोरुन मात्र  'सुरी-कात्रीला धार लावणारा सायकलवरचा धारवाला', 'स्टीलच्या जड भांड्यांची मोठी टोपली डोक्यावर घेऊन  हे$$का डब्बाभांडे म्हणून ओरडणारी भोवारीण' , 'पहाटे टाळ चिपळ्यांचा आवाजात येणारा वासुदेव' आणि 'दुपारची झोपमोड करणारा भंगारवाला' हे सगळेजण क्षणभर तरळुन गेले. आता हे सगळं फार क्वचितच बघायला आणि अनुभवायला मिळणार हे नक्की. 

पशुपक्ष्यांच्या जश्या काही प्रजाती नामशेष होत चालल्यात, तश्याच माहिती तंत्रज्ञान आणि यांत्रिकी आधुनिकतेच्या युगात ही कला-कौशल्य चालीरीती देखील "लुप्त" होतांना दिसतात.

© मिलिंद सहस्रबुद्धे

२४/१०/२०२१

Comments

Popular posts from this blog

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय म...
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ...

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...