Remote... तरीही जवळचा
त्या दशकांमध्ये "जिच्या हाती पाळण्याची दोरी.." तसं घरा-घरात "ज्याच्या हाती रिमोटचं बटण तो.." असं समीकरण होतं.
रात्री साडे आठची वेळ: आमची आई घाईघाईत हॉलमध्ये आली. तिच्या ठरलेल्या सिरीयलचं टाइमिंग झाले होते. रिमोट कुठेय म्हणून शोधत होती. बाबा सोफ्यावर पेपर वाचत बसले होते. त्यांच्याकडे बघून म्हणाली (नेहमीच्या चिडक्या स्वरात, कारण मनात हेच की ह्यांनीच बातम्या बघून कुठे तरी इकडे तिकडे ठेवला असणार.) "अहो बघितलाय का, कुठे आहे remote"
बाबा पण सॉलिड, पटकन म्हणाले " सध्या शरद पवार साहेबांकडे आहे". आम्ही सगळे जोरजोरात हसलो. आईला पण हसू आवरले नाही, जरी तिला रिमोट अजून सापडला नव्हता तरी.
तसाही सध्या महाराष्ट्राचा रिमोट "बारामतीच्या गोविंदबागेतच" आहे. त्याच्याआधी "नागपूरच्या रेशीमबागेत" होता. मात्र सुरुवात झाली ती कलानगर "मातोश्रीच्या परस बागेतून".
खरंच, रिमोट ही अशी वस्तू आहे की जेव्हा ती हातात येते ना तेव्हा आपण जणू काही काळा पुरते अनिभिक्त सम्राट असल्यासारखं वाटतं. बदाम सात खेळताना शेवटची सत्ती आपल्या हातात असली की जे एक फिलिंग असतं ना अगदी तसं. हा रिमोट टीव्हीचा, एसीचा असो अथवा music player चा. Remote हातात असणं ह्या सारखा दुसरा माज नाही. घरातला रिमोट तुमच्या हातात असेल तर उत्तमच मग काही विचारायचं काम नाही. परंतु सध्याच्या पिढीत घरचा remote बाईसाहेबच्याच हातात असतो.
ऐंशीच्या दशकात भारतात टेलिव्हिजन ची सुरुवात झाली. हळूहळू घरात टीव्ही येऊ लागले. सर्वप्रथम फक्त डीडी म्हणजे दूरदर्शन असल्यामुळे टीव्ही चा मेन स्वीच हाच ऑन ऑफ करावा लागायचा. बाकी आवाज कमी- जास्त करण्यासाठी उठावं लागायचं. टीव्हीच्या गोल फिरणारी बटणांवर एक ते बारा नंबर असायचे पण लागायचा एकच.
साधारण दहा वर्षांनी म्हणजे 90 सालाच्या सुमारास अमेरिकेतील स्टार टीव्हीचे जनक रुपर्ट मॅरडॉक ह्यांनी विविध स्टार चॅनल्सची क्रांती भारतात आणली. पुढे मग अस्सल भारतीय अश्या झी समूहाचा उदय झाला. त्यातूनच मग अनेक चॅनल्स जन्माला आले. रिमोट असलेल्या टीव्हीची मग गरज भासू लागली. नंतर मात्र ही संख्या वाढत गेली आणि मग रिमोट कंट्रोल वाले टीव्ही घराघरात दिसू लागले.
आधी ०-१० मग ०-१०० आणि आता तर ०-९९९९ पर्यंत चॅनल्स असतात. अशी ह्या remote chya "गुणांची" प्रगती आहे. अगदी मॅट्रिक च्या दिल्या जाणाऱ्या गुणांप्रमाणेच..वाढत आहे.
आजकालची तरूण, लहान अथवा किशोरवयीन मुलं जसं मोबाईलवरच्या ॲप वापरतात. ह्या App वरून त्या App वर पापणी लावण्याच्या आधी जातात. एकाच वेळी चार चार मित्र मैत्रिणींबरोबर सुपर फास्ट चॅटिंग करतात. तसंच काहीसं नव्वदच्या दशकात रिमोट हॅंडल करणं एक कौटुंबिक कौतुकास पात्र असं स्कील होतं. एक वेगळंच भन्नाट आपलं आपण आत्मसात केलेलं कौशल्य.
मुळात म्हणजे रिमोट हातात असला की मग एका वरून दुसऱ्या चैनल वर शिफ्ट करणे; सगळे चॅनल्स तोंडपाठ असणे; जेव्हा एखाद्या चॅनलवर जाहिराती सुरू आहेत तेव्हा लगेच तोंडपाठ असलेला दुसरा चैनल लावून तिथला कार्यक्रम थोडासा टीजर सारखा बघणे; विविध चैनल वरचे आवाज कमी जास्त हवे तसे करणे. अश्या करामती (किडे) लिलया जमायचे.
रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघताना आई ओरडायला नको "कारट्या रात्रभर टीव्ही चालू होता!" म्हणून रिमोट वरच्या टाईम वर ऑफ लावून झोपणे. अजून एक गंमत म्हणजे या रिमोट वरचं "बॅक बटण". हे बटण खुबीने वापरुन दोन चॅनल समांतरपणे बघणे. "अर्थात कोणते दोन ते सुज्ञांना सांगायला नको".
ज्याच्याकडे घरात रिमोट असायचा किंवा बहुतेक त्या वेळेस तरुण वर्गाकडेच असल्यामुळे घरातले सगळेजण "अरे बाबा/ अगं बाई हे लाव ना प्लीज". मग त्या व्यक्तीची मिजास काय विचारता.
त्या दशकांमध्ये "जिच्या हाती पाळण्याची दोरी.." तसं घरा-घरात "ज्याच्या हाती रिमोटचं बटण तो.." असं समीकरण होतं.
तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाला रोजच्या जीवनात दुसऱ्याला कंट्रोल करायला आवडतं आणि दुसऱ्याला शिस्त लावायला आवडते. ती सुप्त इच्छा हा रिमोट पुर्ण करत होता आणि अजूनही करतोय काही प्रमाणात.
2010 नंतर मात्र साधारण सेट टॉप बॉक्स आणि विविध ऑनलाइन करमणुकीची साधनं निर्माण झाल्यामुळे या एका रिमोटचं महत्त्व कमी होऊन दोन रिमोट प्रस्थ वाढलं. अर्थातच रिमोट जरी दोन झाले तरी एका रिमोटची जी मजा होती ती काही दोन झाले म्हणून द्विगुणीत झाली नाही. उलट दोन रिमोट मुळे जरा जास्तच अवघड झाल्यासारखं झालं. हे म्हणजे पहिल्या मुलाचं जेवढं कोड कौतुक होतं तेवढंच दुसऱ्याचं होतच असं नाही तसंच काहीसं.
त्यानंतर मोबाईल चा जन्म झाला. आमचा तसा हा रिमोट मग बाजूला पडू लागला. सोशल मीडियावर ऑनलाइन प्रोग्रॅमचा बोलबाला सुरू झाला. आता तर घरोघरी हातोहाती मोबाईलवर सगळेजण कार्यक्रम बघणं सुरू झालं. तेसुद्धा आपल्याला हवे ते आणि आपल्याला हवे तेव्हा
भारतीय राजकारणात देखील 2014 नंतर रिमोट कंट्रोल ची जागा सोशल मीडियाने घेतली "नाही का?"
तर असा हा रिमोट, मात्र अजूनही मनात कुठेतरी एक जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो जुना काळ सतत आठवण करून देतो आहे.
रिमोटचा अप्रूप बघा किती आहे अजूनही. परवा अमेरिकेत स्थायिक चुलत बहिणीचा फोन आला होता. आनंदाने उड्या मारत होती. म्हणाली काय? तर, "दादा, मी आज जाम खुश आहे. अरे मला इथं साठ चॅनल्सचा सेट टॉप बॉक्स मिळालाय आणि तो चालवायला रिमोटपण. खूप मजा येणारे आता चॅनल सर्फिंग करायला. किती वर्ष/महीने झाले ते ऑनलाईन ऑनलाईन प्रोग्रॅम बघून. रिमोटची मजा ती रिमोटचीच"
टीव्ही प्रेमीच्या जीवनातील "आपल सगळं ऐकणारा" Remote हा एक हक्काचा भिडू होता.
असा हा नावात Remote (लांबून) असला तरीही जवळचा.
© मिलिंद सहस्रबुद्धे
१०/१०/२०२१
ललिता पंचमी.
ता.क.
लिहीतांना सुचलेलं..
"कधी जमलं तर काही काळापुरते आपल्या जवळच्या माणसाचा रिमोट होऊन बघा. त्यांना मिळणारा आनंद अनुभवा."
काहीतरी वैचारिक द्यायला हवं ना 😉
Comments
Post a Comment