Skip to main content

"आणि विजय पराभूत..."

 दिवाळी विशेष 🙏

"आणि विजय पराभूत..."

नव्वदच्या दशकात रंगीला सिनेमांमध्ये आमिर खानचा एक डायलॉग फेमस झाला होता. तो पिक्चरच्या थिएटर बाहेर ब्लॅकनी तिकीटं  विकत असतो. "दस का बीस, बाल्कनी बीस का तीस, सिर्फ दो बची है".  एकजण येतो आणि विचारतो "ऐ, दोन तिकीट है क्या? जरा कॉर्नर की देना" आमिरच तो, तो म्हणतो " है ना एक ये कॉर्नर और एक दूसरी कॉर्नर की" संपूर्ण थिएटर या वाक्याला टाळ्या आणि हशाच्या गजरात दुमदुमून जायचं.

बाल्कनी, स्टॉल,अप्पर स्टॉल, ड्रेस सर्कल अशा विविध terminologyची भर आमच्या सामान्य ज्ञानात पडली ती ह्या थिएटर्समुळेच. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात मित्र-मैत्रिणी नातेवाईकां प्रमाणेच एक अविभाज्य घटक म्हणजे पिक्चरचे थिएटर. आपल्याकडे जशी विविध देवांची मंदिरा प्रसिद्ध आहेत जशी दगडूशेठचा गणपती, तांबडी जोगेश्वरी तशीच ही विविध थिएटर्स मनोरंजनाची मंदिरच होती. होती म्हणायचं कारण आता मनोरंजन प्रत्येकाच्या हातात सामावला आहे.  

बालाजी, शिर्डी, पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी भाविक रात्र-रात्रभर रांगा लावून थांबायचे. अहोरात्र थांबून देवदर्शन घेतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जणू देव भेटल्याचा परमानंद दिसायचा. तसंच दर शुक्रवारी एखादा ब्लॉकबस्टर पिक्चर येणार असेल तर गुरुवार सकाळपासून थिएटरच्या बाहेर भली मोठी रांग असायची. मग छोट्याश्या खिडकीतुन तिकीट मिळाल्यानंतर जो काही आनंद व्हायचा तो खरंच गगनात न मावणारा असायचा. पिक्चरचे तिकीट काढताना छोटेश्या खिडकी पलिकडे किती मोठं विश्व सामावला असेल हयाची कल्पना येत नाही जोपर्यंत आपण तो पिक्चर पहात नाही. थिएटर ला जाऊन "हाऊसफुल्ल"चा बोर्ड बघणं, म्हणजे आपलं पानिपत झाल्यासारखं वाटायचं. 

परंतु आता जसं शिर्डी आणि बालाजीचं रोजच लाइव्ह ऑनलाईन दर्शन घेता येतं तसं पिक्चर हातातल्या मोबाईल वरील कोणत्या ना कोणत्या तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधीही बघता येतो.  

ना तिकिटाची मजा ना थिएटरमध्ये आत जाऊन तीन तासातल्या त्या इंटरवल ची मजा. 

अस्सल पुणेकरांसाठी निलायम, मंगला, राहुल, विजय, अलका, लक्ष्मीनारायण, प्रभात अशी आवडती मनोरंजनाची मंदिर होती. महिन्या-दोन महिन्यातून या मनोरंजनाच्या मंदीरातील देवदेवतांचे दर्शन घेतल्यावर आणि या मंदिरांत हजेरी लावल्याशिवाय आपण ऐश्वर्य आणि सुखाचे जीवन जगतोय असं वाटायचंच नाही. 

अर्थात प्रत्येक थिएटरचा एक वेगळा ठसा वेगळे वैशिष्ट्य होतं. इथंपण मला मंदिरांशीच साध्यर्म वाटतं. काही देवस्थळं ही नवसाला पावण्यासाठी प्रसिद्ध, काही तिथल्या जत्रे यात्रेसाठी प्रसिद्ध असतात तर काही तिथल्या सुंदर कलाकृती साठी प्रसिद्ध असतात.  तशीच प्रत्येक थिएटरची काही वैशिष्ट्ये होती किंवा आहेत. सर्वसाधारणपणे निलायम मंगला अलका लक्ष्मीनारायण ही हिंदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध होती. विजय, प्रभात, भानुविलास आपल्या मराठी चित्रपटांसाठी. Hifi इंग्रजी चित्रपट असतील तर मग राहुल किंवा तिकडे टोकाला कॅम्पातलं वेस्टंएड किंवा व्हिक्टरी.  अगदीच जवळचंच हवं असेल तर गावातलं लकडी पुलाच्या इथलं अलका टॉकीज. 

प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या थिएटर बरोबरच्या विविध आठवणी कायम जोडल्या गेलेल्या आहेत. हा भारत देश पिक्चर वेडा आहेच, पण त्यातूनही मराठी माणूस हा जरा जास्तच. अगदी ज्यांना सिनेमाची आवड नाही त्यांची पण एखादी गोड आंबट आठवण एखाद्या थिएटरशी हमखास जोडली गेलेली. 

'अलका'ला हळूच नजर चुकून किंवा पाय उंच करून आणि खोटे वय सांगून बघितलेला "Basic Instict" सारखा एखादा A for adult पिक्चर असेल.  दिवाळीच्या सुट्टीत हमखास ठरलेला संपूर्ण कुटुंबाबरोबर 'प्रभात'ला पाहिलेला अशोक लक्ष्याचा "गंमत जंमत" असेल. कॉलेजमध्ये असताना एखादं लेक्चर बंक करून 'राहुल'ला मॉर्निंग किंवा मॅटिनीला टाकलेला एखादा देमार हॉलीवुड एक्शन धमाका असेल. (मॉर्निंग किंवा मॅटिनीला पिक्चर टाकला, असंच म्हणतात, शास्त्र असतं ते) तारुण्याच्या उंबरठ्यावर खास मैत्रिणी बरोबरचा 'मंगला किंवा निलायमला' अंधारात शेजारी शेजारी बसून पाहिलेला "मैने प्यार किया" असेल. एक ना दोन असंख्य आठवणी. प्रत्येक पिक्चरची आणि त्या थिएटरशी एक आठवण.

कधीही विसरणार नाही असा "मंगला'नी दिलेला जीवनातील पहिला 3D पिक्चरच अनुभव. स्पेशल चष्मा घेऊन पाहीलेला "छोटा चेतन"

स्टॉल रु. 30 ,अप्पर स्टॉल ड्रेस सर्कल रु.50 आणि बालकनी 90 रुपये हा सर्वसाधारण सगळ्या थिएटर्सचा ठरलेला दर. (त्याकाळी INR किंवा Rupay चा जन्म झाला नव्हता.)  प्रत्येकाला परवडेल त्यानुसार तो तिकीट काढून पिक्चर बघणार. 

पिवळी, हिरवी, नीळी तिकीटं आणि मग डोअरकीपर अर्ध टिकीट आपल्या हातात फाडून देणार. अंधारातल्या टॉर्च मध्ये सीट शोधत-शोधत आधीच बसलेला लोकांच्या पायावर पाय देत जाऊन बसण्यात एक वेगळीच गंमत होती.  इंटर्वल- मध्यांतर हयात गोल्ड्स्पॉट - थम्सअप च्या बाटल्या पिणे. एखादा सामोसा, वडापाव कधीतरीच पॉपकॉन खाणे. Interval नंतर पिक्चर सुरु व्हायच्या आगामी पिक्चरच्या जाहिराती धावतपळत जाऊन पहाणे. आहाहा काय मजा. हे म्हणजे पु ल देशपांडे हयांच्या भाषेत सांगायचं तर करा लेको चैन रोज शिक्रण खा मटार उसळ खा.

काही पिक्चर स्टॉल च्या पहिल्या रांगेत बसून आम्ही कसे बघितले, डोळे कसे लाल झाले, काय धमाल केली याचा किस्सा मित्रांमध्ये सांगायचा.  तर आप्तेष्ट नातेवाईकांच्या बैठकीत आम्ही कसे नेहमी बाल्कनीतूनच पिक्चर बघतो.  तेही A किंवा B रांगेतूनच असं सांगत आपण कसे  ELITE आहोत हे दाखवणे. 

त्याकाळी लक्ष्मीनारायण हे एकमेव थिएटर होतं ज्याला 'मॅजेस्टिक बॉक्स' नावाचा एक बाल्कनीच्या वरचा असा क्लास होता. साधारण 20 ते 25 जणांचीच खास  बैठक व्यवस्था होती. हल्ली जसा मल्टिप्लेक्समध्ये RECLINER CHAIR चा माज असतो ना तसा माज तेव्हा मॅजेस्टिक बॉक्स मधे बसण्यात होता. मंगला, निलायम, अलंकार, वेस्टंएड, राहुल साधारण पांढरपेशी वर्गांसाठी.  तर अप्सरा ,वसंत, सोनमर्ग,विक्टरी, अलका ही पिटातल्या प्रेक्षकांसाठी असं वर्गीकरण हे आपोआपच झालेलं होतं. हया वर्गीकरणा मुळे त्या त्या थिएटर्स ला त्या त्या स्टाईलचे पिक्चरही तसेच लागायचे. विजय आणि प्रभात अस्सल मराठीसाठी ठरलेली. 

अगदी सुर्यकांत मांढरेंच्या "आपली माणसं" , दादा कोंडकेंच्या "सोंगाड्या" पासून ते आत्तापर्यंतचा सुबोध भावेचा "विजेता" चित्रपटापर्यंत मराठी पिक्चर विजय आणि प्रभातनी नेटाने लावले होते.  दहा-पंधरा वर्षांपूर्वी मल्टिप्लेक्स जमाना आला त्यात काही थिएटर काळानुरूप बदलून मल्टिप्लेक्स झाली. उदाहरणार्थ मंगलाचं सिटी प्राईड झाले. परंतु सिंगल स्क्रीन थिएटर मात्र त्या वादळात सुद्धा तग धरून राहिली. टिकली आणि कायम प्रेक्षकांनी भरभरून राहिली.

२०२० च्या कोरोना महामारीने मागील दीड वर्षात हया सर्व सुंदर थिएटरची शानच घालवुन टाकली. कित्येक महिने ओस पडलेली थिएटर्स. शेवटी त्यांनीही हात टेकले. जसं हातावर पोट असतं तसं ही प्रेक्षकांच्या तिकिटावर पोट असलेली थिएटर्स.  हया काही वर्षांमध्ये पिक्चरच्या अन्नपाण्याविना भुकेली राहिली. प्रतिकार आणि सहनशक्तीचा अंत झाल्यावर मात्र धारातीर्थी पडू लागली.

मल्टिप्लेक्स,ऑनलाईन बुकिंग आणि ओटीटीच्या झगमगाटापुढं हया मिणमिणत्या तेजोमय पणत्या हळूहळू काजोळल्या जाऊ लागल्या. पुण्यात वाडा संस्कृती नामशेष होऊन REDEVELOPMENT चा जन्म झाला.  तसेच Single Screen थिएटर्स मागे पडली आणि काही कायमची बंद.

निलायम,राहुल, प्रभात, वसंत अशी बरीच आता बंद आहेत. वाट पाहत आहेत की कोणी येईल आणि आपले पुनर्जीवन करेल. LOCKDOWN संपून दोन महिने झाले तरी त्यांची रया गेलेली दुरावस्था बघवत नाही. ज्या थिटर्सची एकेकाळी ऐशोरामी मिजास होती आज त्यांना सुरकुतलेले पाहिलं की डोळ्यात पाणी येतं.

दिवाळीच्या खरेदीला लक्ष्मी रोडवर हिंडताना अचानक विजयच्या चौकात आलो. चौकात उत्सुकतेने थांबलो पण विजय नव्हतंच. तिथं निळा पत्र्यांनी संपूर्ण परिसर वेढलेला आणि ती मोठी टोलेजंग "लिमये चित्र मंदिराची" वास्तू जमीनदोस्त झालेली. ती पाहून मनात विचार आला " आणि विजय पराभूत झालं"

© मिलिंद सहस्रबुद्धे

०७/११/२०२१

पिक्चर वेडा.

तळटीप-

हे लिहितांना, माझ्यासारख्या पिक्चरवेड्या मनात, चाळीस वर्षातले आठवणींचे ढग जमा झाले की डोळ्यावाटे चिंब बरसात झाली. मनात आलं,  की प्रत्येक थिएटरवर एक स्वतंत्र लेख होऊ शकेल.

Comments

Popular posts from this blog

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ...

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...