चौरंग
वयोमानानुसार आणि विविध अनुभवांनी जीवन आपल्याला बरेच काय काय शिकवते..
कधी कधी आपणच अनावधाने केलेल्या चुका लक्षात येत नाहीत. पण निसर्गनियमाप्रमाणे परत आपल्याच बाबतीत असं घडल्यानंतर कुठेतरी आपण पण असं कधी वागलो होतं का असं वाटतं आणि आठवतात काही प्रसंग.
आपण एखाद्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये फॅमिली बरोबर छान डिनर करत बसलेलो असतो. आपण वर्ष दोन वर्षांपूर्वी अश्याच ओळखीच्या एका माणसाचा अडलेले काम करून दिलेलं असतं. तेव्हा तो माणूस चार वेळा आपल्याला भेटून एखादी भेटवस्तू देऊन थँक्यू म्हणून आपल्याशी नम्रतेने वागत असतो. नेमका आज हॉटेलमध्ये तोच माणूस, ती व्यक्ती त्याच्या मित्रांबरोबर बसलेली असते. आपली नजरानजर होते. आपण त्याला हात करतो. तोही आपल्याला छान हात करतो. क्षणभर आपल्याला वाटतं की तो आता आपल्या इथे येईल, आपल्याशी काय म्हणताय म्हणून दोन शब्द नक्की बोलेल. आपण आपल्या घरच्यांशी जुजबी ओळख करून देऊ वगैरे. पण तो मात्र आपल्याला हात करून नंतर मित्रांच्या गप्पांमध्ये रंगलेला दिसतो. हा तोच आहे ना नक्की असा आपल्याला चार वेळा प्रश्न पडतो. दोन वर्षापूर्वी घडलेल्या प्रसंगांमध्ये अजून अडकलेली असते प्रसंगांची आठवण.
ती आठवण निर्माण करते उपेक्षेतला अपेक्षाभंग.
मुलाला नोकरी मिळावी म्हणून बाप ओळखीच्यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये खेटा घालत असतो. त्यांच्याच ओळखीने त्या मुलाला नोकरी मिळते. सुरुवातीला मुलगा पेढे वगैरे देतो. अगदी वाकून नमस्कार करतो. काही काळ संबंध ठेवतो. पुढे काही वर्षांनी बदली होऊन तेच ओळखीचे मुलाच्या गावात राहायला येतात. तेव्हा मात्र जुजबी ओळख असल्यासारखी त्या मुलाची वागणूक बदललेली असते.
मदतीला मोल नसतेच पण म्हणून नाममात्र किंमत ही नसावी ह्याची खंत वाटते.
असं का होत असेल काळानुरूप माणसं विसरतात. काळ जसजसा पुढे जातो तस तसे त्या गोष्टीचं, प्रसंगांचं महत्त्व माणसाच्या जीवनात तितकसं राहत नाही, जितकं त्या विशिष्ट वेळेस होतं. मग बहुतेक त्या माणसाचं महत्त्व देखील.
अर्थात त्या गोष्टीचे, प्रसंगाचे आणि त्या वेळेला असलेलं त्या माणसांचे महत्त्व हे वयानुसार बहुतेक जीर्ण होत जात असावं.
अशा वेळेस खरोखरच पु.लं देशपांडेंच्या नारायणाची आठवण येते. लग्नकार्यात राब राब रबलेला नारायण, लग्नानंतर कुठल्या अडगळीच्या खोलीत जाऊन झोपतो कोणालाच कळत नाही आणि आठवतही नाही. अगदी लग्नातल्या चौरंगा सारखा. त्या चौरंगाची आठवण पुन्हा येते ती फक्त पुढच्या सत्यनारायण पूजेला किंवा मंगल सोहळ्यातच.
केळीची पानं आणि रांगोळीने त्याची तोंड देखली सजावट केली जाते. कार्य पार पडलं की तोच चौरंग पोट माळ्यावर जाऊन पडतो.
"काही जणांच्या आयुष्यात आपण चौरंगासारखे असतो. एकदा का कार्यभाग साध्य झाला की हा चौरंग अडगळीत जाऊन पडतो"
एकदा का कार्यभाग साध्य झाला कि आठवण होत नाही ती ...
ना देवळातल्या नारायणाची
ना कार्यातल्या नारायणाची
- मिलिंद सहस्रबुद्धे
पुणे ३०
Comments
Post a Comment