"अनोळखी आठवण"
मोबाईलवर आलेल्या कॉलला ग्रीन बटन swipe करुन मी फोन कानाला लावला....
"हायss..."
"हैलो.."
"अगं नंबर डिलीट केलाय...आठवणी नाही"
असं बोलतांना मनातल्या मनात छदमी हसलो मी...
मी विचारांचे कित्येक बोगदे पार केले क्षणार्धात. एवढी वर्षे झाली FB, Instagram वर एकमेकाला लाईक करणे ह्या virtual भेटी व्यतिरिक्त, प्रत्यक्ष भेटणं तर लांबच पण आम्ही दोघांनी साधं एकमेकांना पाहिले देखील नव्हतं.
आज दोघंही शहराच्या एकाच भागात राहतो, पण काय देवाची किमया. एकदाही भेट झाली नाही की साधी नजरानजर. काय असेल हे त्या विधात्यालाच माहीत.
भावनांची काय जादू असते, जेव्हा एकत्र होतो तेव्हा दोघांची घरं कित्येक किलोमीटर अंतरावर होती. तरी रोज भेटायचो. रोज फोन आणि रोज बोलणं, एकमेकाला बघणं व्हायचं.
मी माझ्या बाईकवरून हायवे तुडवत पोहचणार आणि ती...
ती बिचारी एक बस बदलून सिक्स सिटर करून यायची.
मध्यवर्ती ठरलेलं ठिकाण. लॉ कॉलेजचा कॅम्पस. बाहेरच असलेलं कॉफी शॉप. साधारण संध्याकाळी रोज अर्धा तास. तोच अर्धा तास जणू दिवसभर भेटल्याचा आनंद द्यायचा. रविवारी मात्र काहीतरी कारण काढून किमान दोन तीन तास तरी भेटणं व्हायचंच.
रोजचा दिवस एक नवीन आनंद, नवीन अनुभव आणि एक नवीन story.
"ओळखलं का मी..."
ह्या एका वाक्यात त्या दोन वर्षांतल्या २×३६५ stories झर्रकन डोळ्यासमोरून तरळून गेल्या. आणि मग त्यानंतर मागील वर्षांमधले कित्येक अंधारमय बोगदे आठवले...
अर्थात जीवनातल्या खडबडीत रस्त्यावरून किंवा हायवे वरून जाताना किंमत ही मोजवीच लागते. खडबडीत रस्ता तुमच्या शरीराची आणि वेळेची झीज करतो..तर हायवे वरचे टोल तुमचे खिसे झिजवतात.
"अगं नंबर डिलीट केलाय...आठवणी नाही"
क्षणभर दोघांना जणू फक्त dialer tone ऐकू आला..
तीच्या नेहमीच्याच लाडीक घुश्श्यात
"त्या कश्या डिलीट करशील आणि त्या होणारही नाहीत. आपल्या दोघांच्या Hard Disc च्या 'झीरो सेक्टर' ड्राईव्ह वर Save झाल्यात त्या कायमच्या. Copy Paste तर करताच येणार नाहीत कुठे आणि Retrive म्हणशील तर अशक्य"
एक पॉज घेऊन...ती
"दोघांचा CPU (computer) सकाळी Reboot केला की पहिल्यांदा Scan 'झीरो सेक्टर' होतो आणि मगच पुढचे c d e f drive सुरू होतात. अर्थात तो 'झीरो सेक्टर' हा computer चा दैनंदिन working साठी किती महत्वाचा आहे हे तुझ्या माझ्यासारख्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला सांगायची गरज नाही"
माझ्या डोळ्यात तिचे अश्रू तरळले होते. मला मगाच च्या माझ्याच छदमी हास्याची लाज वाटली.
"आजही सखे तूच जिंकलीस , नेहमीप्रमाणे मला न हरवता"
पुढे औपचारिक संवाद झाला. तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय. मुलं फॅमिली काय करतात वगैरे.
दोघांचं c d e f सगळे ड्राईव्ह शेअर केले गेले. नंतर तेच ते आपलं नेहमीचं with family lunch/dinner ला भेटू वगैरे म्हणून Data transfer झाला.
"Ok bye..."
" Byeee..Byeee."
तिचा नेहमीच्या सवयीचा दोनवेळा लाँग बाय ऐकला आणि त्या दिवशीचा Computer मी Sleep mode वर टाकला.
- मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ पुणे ३०
ता. क.
हा संवाद काल्पनिक असून, कोणतेही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.
Comments
Post a Comment