Skip to main content

ब्लॅक अँड व्हाईट

 "ब्लॅक अँड व्हाईट"

८० च्या दशकात भारतात जेव्हा टेलिव्हिजन आले तेव्हा ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते. तरी त्यांचं काय ते कौतुक होतं. तुम्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट बघत असलात तरी बघण्याची दृष्टी मात्र रंगीत होती. बातम्या देणारे निवेदक किंवा निवेदिका यांच्या कपड्यांचा रंग जरी दिसताना काळा पांढरा दिसत असला तरी बघणारे प्रेक्षकांच्या मनात मात्र ज्याचा त्याचा रंग असायचा. कोणाला तो लाल-पिवळा, जांभळा-निळा तर काळा दिसायचा. छायागीत बघताना वहिदाच्या मागे धावणारा देवानंद. त्याच्या हातभर शर्टावरचे चेक्स काळे पांढरे दिसले तरी देवानंद चाहत्यांना मात्र त्यात केशरी हिरवा तांबडा रंग दिसत होता. तर वहिदाच्या साडीवरची फुलं नारंगी आणि गुलबकक्षी रंगाची दिसायची. सांगण्याचे तात्पर्य असे की टीव्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट होते तरी बघणारे आपापल्या परीने त्यात रंग भरत होते आणि आनंद घेत होते.
अशाच एका ब्लॅक टीव्हीचा २१व्या शतकात बघण्याचा योग परवा मुंबईमध्ये बीकेसीच्या मैदानावर पुन्हा आला. माननीय पंतप्रधान मोदीजी आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मंचावर एकत्र बसले होते. "एक पांढरी दाढी आणि एक काळी दाढी एका फ्रेम मध्ये". बघायला गेलं तर ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच जणू. या ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही ची जादू समस्त मुंबईकरांनी आणि प्रसार माध्यमांमुळे महाराष्ट्राने त्या दिवशी अनुभवली.
दोघांनी जनतेला विविध रंगांची उधळण केली. मुंबईतील विविध मेट्रो लाईनच्या उद्घाटनात एक पिवळा आणि एक लाल रंग होताच. मोदीजीं नी मुंबईच्या विकासाला तिहेरी इंजिनची गरज असल्याची भूमिका अधोरेखित करताच, भाजपवासीयांना भगव्या-हिरवा पट्टा रंग दिसायला लागला आणि कमळाची आठवण आली. तर शिंदेजींनी मागील सरकारमधील विविध भ्रष्टाचार आणि अपूर्ण केलेली काम यांची यादी वाचून करडा रंग उलगडून दाखविला.
"स्वनिधी" सारखी अनोखी योजना अमलात आणून मोदीजींनी मुंबई ही अजून कशी रंगीबेरंगी होईल याची माहिती सांगितली. जर फेरीवाले, हातगाडीवाले, रस्त्यावरील छोटे दुकानदार ह्यांना अशा योजनेचा मुंबईत फायदा मिळाला तर नक्कीच विविध प्रांतातील रंग मुंबईत वाढत जातील. एक वेळ अशी येईल की या विविध रंगात मूळ मराठी भगवा रंग अत्यल्प प्रमाणात दिसू लागेल. असो. तशीही मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे इथं रुपयाच्या नोटेचे विविध रंगच महत्त्वाचे असतात आणि उपयोगाला येतात.
शिंदेजींच्या भाषणात अधून मधून डोकवणारा क्रांतीचा लाल रंग जणू कलानगर मध्ये होणाऱ्या सूर्यास्ताची आठवण करून देत होता. मोदीजी देशभर केलेल्या विकासाचा पाढा वाचतांना निळा पांढर्या रंगांची नक्षी श्रोत्यांच्या डोळ्यासमोर आली.
समोर बसलेला सागरासारखा अथांग जनसमुदाय आशेने या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीची भाषणातून होणारी इंद्रधनुष्य रंगांची उधळण आपल्या डोळ्यात आणि कानात साठवत होता.
आपल्या रोजमराच्या जिंदगीत ह्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीने खरंच किती रंग भरतील याची शाश्वती मात्र त्याला अजूनही होत नव्हती. ह्या टीव्हीची अँटिना कधी कोणत्या दिशेला हालेल आणि मग सिग्नल येईनासा झाला तर या अंधूक भीतीनेच तो आपापल्या घरी गेला.
-----------
- मिलिंद सहस्रबुद्धे
२९-०१-२०२३
सदाशिव पेठ पुणे ३०
ता.क.
मराठी-इंग्रजी-हिंदी भाषा संभाळून घ्या. 🙏

Comments

Popular posts from this blog

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ...

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...